Tuesday, August 31, 2010

उत्तर ............... !


          उत्तर ............... ! 


सांगाया जे पाहीजे ते तुला सांगायाचे राहीले

व्यक्‍त होण्या ह्रदय माझे मागे कसे राहीले


नयनांची भेट होता जे कळो आले असे

बोलण्याची वेळ येता शब्द हरवू लागले


भ्याडपणा असला कसा कोणी नसते साहीले

माघारीचे प्रश्‍न असले हेही नव्हते पाहीले


प्रश्‍न तो आमचाच होता म्हणून फक्‍त काळजी

उत्‍तर त्याचे शोधताना सर्व पणाला लागले.

                                       - समीर पु. नाईक

Monday, August 30, 2010

! अलिकडे !

        ! अलिकडे !


टेरेसवरती अलिकडे जेंव्हा मी जातो

टॉवर्सच्या जंगलात हरवून मी बसतो


सुर्योदय आणि सूर्यास्त टॉवर मागेच होतो

चांदोबा सुध्दा आता टॉवर मागे लपतोटॉवर्स काय कमी होते ,जोडीला होर्डिंग आली

उंच उंच बिल्डिंगांची गर्दी फार झालीटॉवर म्हणजे यांत्रिक झाड ,कावळा फक्‍त बसे

बाकी पक्षी दिसत नाहीत, गायब झालेत जसेटॉवर मात्र हवेतच मोबाईलला रेंज

झाडं जरी तोडली तेव्हढाच जरा चेंजकाळ सतत बदलता आहे हे जरी खरं

मूळ कधी विसरू नये लक्षात ठेवा बरंभौतिक आणि वास्तविक फरक थोडा यात

भौतिकतेची साधनं सुख भासवतातनितळ सुख फक्‍त आहे निर्मळ त्या प्रेमात

निसर्ग सच्चा सोबती माणसांच्या जंगलात

                                  - समीर पु. नाईक

Tuesday, August 17, 2010

! कवी !

मी ऑर्कूट वरती माझ्या फ्रेंडसर्कलमध्ये मला आवडलेल्या , काही वेळा माझ्या कविता पाठवत असतो.


एकदा स्नेहाला [ माझी मैत्रीण ] पाठवलेली कविता वाचून तीने विचारले , काय रे तू चक्क कवी ????केंव्हा झालास ?उत्‍तरात जे सुचले ती ही कविता !   !   कवी !

ती मला विचारी
तू कवी केंव्हा झाला
आम्ही तिला कळविल्या
आमच्या कवी अवताराच्या लीला

ती पाहूनिया बाला
आमचा होश उडूनी गेला
आणि अस्मादिकांचा
तेंव्हाच कवी झाला

ऐकूनिया उत्‍तर आमुचे
ती पुढे मला म्हणाली
’ती ’बाला कोण आहे
सर्वांहूनी निराळी

आम्ही पुन्हा कळविले
मातीत येथल्या ती अप्सरा उतरली
क्षितीजाच्या पलीकडे
जशी चांदणी चमकली

परंतु आम्हापुढे ते
एक प्रश्‍नचिन्ह होते
ह्रदय आमुचे ते
तिजला माहितच नव्हते

भावनांना व्यक्‍त करण्या
कविता भला मार्ग आहे
म्हणून या कवीच्या
जन्मास अर्थ आहे !

                 -समीर पु. नाईक

Monday, August 9, 2010

? शाप ?


माझ्या कॉलेजमधील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली .मन विषण्ण होणे म्हणजे काय याचा नेमका अनुभव आला , त्यातच १०-१२ वी तील अगदी कोवळ्या मुलामुलींच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले. इतका मोठा आयुष्य संपविण्याचा निर्णय केवळ एखाद्‍यादुसर्‍या अपयशामूळे घेताना त्या मूलाला/मूलीला काहीच वाटलं नसेल ,संकटांना घाबरून पाठ फिरवायची नसते, त्याला सामोरे जायचे असते हे त्यांना कोणी कधी सांगितले नसेल , आई-वडीलां चा जराही विचार त्यांनी केला नसेल , की त्यांच्याच भीतीमूळे....................................................................?


प्रश्‍न न संपणारे ?????????????????????????

यामूळे साध्य काय झाले , काय उरले ,.............................................?????????

जे आतून आले ते वहीत उतरलं ........................................? शाप ?

तो आत्महत्येचा अवघड

निर्णय घेऊन निघून गेला

मागे उरले फक्‍त

आभाळ फाटलेली माय

कोसळलेला बाप

आक्रंदणारी बहीण

आणि अनिश्‍चिततेचा शाप !

- समीर पु. नाईक

Saturday, August 7, 2010

! अवेळीचा पाऊस आणि तू !

! अवेळीचा पाऊस आणि तू !


अवेळी येणार्‍या पावसाला पाहून
मला आठवतेस ती , तू


धांदल, गडबड उडवणारी ,
चकीत करणारी तू


मी येतेय रे , आपण भेटूया
असल्या क्षूल्लक शिष्टाचारात न पडणारी तू


रोजच पडतोय असा येणारा पाऊस
आणि कालच भेटल्यासारखी बोलणारी तू


अवेळीच्या पावसाला मी हरखून पाहत राहतो
व वर्षभराचं एकदम बोलणार्‍या तूलाही


झाडं,रस्ते,बिल्डींग,बंगले सगळ्यांना चैतन्य देणारा पाऊस
माझ्या मनाचं मळभ हटवणारी तू


अवेळी आला तरी सुखावणारा पाऊस
प्रसन्नतेचा शिडकावा करणारी तू


अवेळी येणार्‍या पावसाला पाहून
मला आठवतेस ती , तू !

                         - समीर पु. नाईक

Friday, August 6, 2010

! प्रीत !

        ! प्रीत !


कासावीस जीव झाला
क्षण एक आठविता
भेट डोळ्यांची डोळ्यांशी
प्रीत दिसूनिया येता !


गुढ आपले गुपीत
दोघांनाच ठावे फक्‍त
मी सामोरीया येता
तुझा चेहरा आरक्‍त !


काळेभोर नेत्र तुझे
तू रोखुनीया पाही
तुझ्या नजरेत मी
असा गुंतूनीया राही !


सैरभैर मन माझे
आत हूरहूर दाटे
तुझा विरह,विरह
जसे गुलाबाला काटे !


मना फक्‍त हे कळेना
व्यक्‍त कसे मी करावे
सांग तूची प्रिये आता
किती किती मी झूरावे !

                                   -समीर पु. नाईक

! मुखवटा !

! मुखवटा !


मी खरा की तो खरा
प्रश्‍न हा जेंव्‍हा पडे
कल्पनांना माझ्या तेंव्‍हा
भेदूनी जाती तडे


तो निर्मळ,नितळ वागे असा
मागोवा घेताना त्याचा
मी नाटकी,कारस्थानी
हाच आहे माझा साचा


तो आहे स्वच्‍छ,अपेक्षांचा निरीच्‍छ
सच्‍छील वर्तनाचा आरसा जसा
मी मात्र सहज विरूध्‍द
कुटील आणि कृत्रिम आहे कसा ?


तो उदार आणि निर्विकार
चैतन्याचा साक्षात्कार
मी विकारांचा प्रकोप
प्रक्षुब्ध जसा हाहा:कार


तो आणि मी आहोत
गुंतलेल्या वटजटा
मी म्हणजे तो आणि
तो माझाच मुखवटा !

                                - समीर पु . नाईक

Thursday, August 5, 2010

! मन !

! मन !

रात्र काळी घनघोर
चित्‍त नाही थार्‍यावर
पाय फुटतील तसे
मन धावे वार्‍यावर

जरी पायी रूते काटा
मना त्याची तमा नाही
जगी निद्रीस्‍त शांतता
आत वादळाची ग्वाही

मन उद्वेगाने कुढे
संतापाची त्याला जोड
सैरभैर किती जीव
जाणीवांची तोडफोड

उद्रेकाच्या काळा मध्ये
हाती घडे काही बाही
मन पश्‍चातापी पोळे
त्याचा उपयोग नाही

रात्री नंतर तो दिन
जसा येई बरोबर
चित्‍त ताळ्यावर येई
चंद्र चांदणे पिठूर

ज्याला संयमाची जाण
त्याला जीवनाचे भान
मना आवर ठेविता
जगणेच मूक्‍त गान

                   -  समीर पु . नाईक

Wednesday, August 4, 2010

! जाग !


एके दिवशी सकाळी स्नान करून देवासमोर उभा राहिलो,नमस्कारासाठी हात जोडले आणि यात जराही
अतिशयोक्ती नाही..........................मनात शब्द उमटले , उमटत गेले. नंतर लिहून ठेवली .


जाणीवांच्या पार आता ध्यान माझे लागू दे !
अंतराच्या आतमध्ये आत्मज्योत पेटू दे !

झोपलेले ज्ञानचक्षू जागू दे,अनिवारू दे !
चेतनेला साथ आता सृजनशक्ती देऊ दे !

भान येथले जगाचे हरवू दे ,ते जाऊ दे !
सत्याला शोधण्याचे वेध फक्‍त लागू दे !

वासनांचे किल्मीष मनी जे नष्ट सारे होऊ दे !
षडरिपूंना तारतम्याचे ते कुंपण राहू दे !

विचारांच्या पलीकडे अस्तित्व आहे कोणते ?
अस्तित्वहीनतेचे रूप कैसे ते जाणूनी घेऊ दे !

संन्यस्त आणि गृहस्थ फरक कोणता असे !
युध्द आपापल्या जगांशी दोघांचेही सारखे !

सगुण आणि निर्गुणाचा भेद कोणता असे ?
जाणण्या त्या मूळ रूपा जाग मजला येऊ दे !

                             - समीर पु. नाईक