Tuesday, January 11, 2011

ज्या गोष्टी......

ज्या गोष्टी......



ज्या गोष्टी कधीही करायच्या नसतात मला
त्याच गोष्टी न चुकता करत जातो मी



जसं कुणी वागण्याची मी कल्पनाही करू शकत नाही

अगदी तसाच वागत जातो मी



जे करणे केवळ शुध्द मूर्खपणा आहे हे धडधडीत दिसूनही

तेच पुन्हा पुन्हा करत राहतो मी



काहीवेळा स्वत:चा तीव्र तिरस्कार वाटला तरीही

तसंच, तेच वागायची , करायची जिरत नाही माझी खूमखूमी



सगळं काही कळत असूनही , हे सारे माझ्याही नकळत

होत असण्याच्या कारणाआड सहज दडायला नक्कीच आवडतं मला



मी फक्त घाबरतो ते उघडा पडायला , म्हणून असेल कदाचित

कधीही कारणांची वानवा नसते माझ्याकडे



कळकळीच्या उपदेशांच्या शेकडो डोसांकडे कानाडॊळा करून

इतरांना उपदेशायला सदैव अग्रेसर असतो मीच



जरी मला माझंच कुठलं तरी अंतर्मन खात असले

आणि सद्‍सदविवेकबुध्दीचे भाले टोचत असले असंख्य



निर्ढावलेला निब्बरपणा समर्थ आहे माझा

अशा आतल्या शत्रूंना तोंड द्यायला



निव्वळ माझं व फक्त माझंच स्वार्थीपण हे

जगण्यासाठी असलेली धडपड मानतो मी



ज्या गोष्टी कधीही करायच्या नसतात मला

त्याच गोष्टी न चुकता करत जातो मी

- समीर पु.नाईक

Thursday, January 6, 2011

संयम रेष...............?

संयम रेष...............?


तो प्रीतीने व्याकूळलेला , सजण माझा वेडापीर

वियोग-क्षण ठेवीत दूर , करतसे मला उशीर



जाऊ दे सजणा मजला , तुला आहे माझी आण

झाली रात्र किर्र अंधारी , तू असू दे थोडी जाण



लावून मला हुरहूर , तो असा अधिर अधिर

नकळत रात्र सुध्दा , किती होई मदिर मदिर



माझी न राहीली मी रे , मी केवळ रोमांचित

अशा वेळी सखया माझ्या , सावरला का अवचित ?



सौजन्याचा पुतळा आता , पण नंतर का हा वेश

चेतवून आधी मजला , का ओढलीस संयम रेष ?


- समीर पु. नाईक

Wednesday, January 5, 2011

युध्द......

युध्द......


एका भांडणाची गोष्ट............









आज लागले हे निराळेच सूर

चांदण्या दूर त्या , चंद्रही फितूर



संशयाचा उपटला कोणता असूर

ऐक ना हे प्रिये , मी बेकसूर



कोण बोलले तुला ते पोरटोर

वाजवतो त्याला  जरा दोनचार



पिकवले डोके तू , ही कुरबूर

ऐकता वरूनी हे , झाली गुरगूर



भांडे आपटू नको तुझा बाsssप , थोर

कुठून लागला मला, हा नवा घोर



रागही देखणा तुझा चित्तचोर

आजही मी फिदा तू चंद्रकोर



एकनिष्‍ठ मी असे , तू नेम हेर

कळेल सत्य तुला काय ते अखेर



चाललो मी आता हे जग असार

लखलाभ असो तुला हा संसार



नाक धरून मुठीत कशी शरण समोर

जिंकलो मीच, तू जरी युध्दखोर



- समीर पु.नाईक

Saturday, January 1, 2011

तुला जिंकण्यासाठी ....... !

तुला जिंकण्यासाठी ....... !

कुठून तरी दूरातून चालत आला भास

स्वप्नांच्या प्रत्यक्षाची लावून गेला आस

उठ म्हणाला, नूसती बघू नकोत स्वप्नं

जागेवरती बसूनच सर्व काही जपणं



सुरूवात कर लगेचच हीच योग्य वेळ

विचारपुर्वक कर सारे,सगळा घालून मेळ
वाया नको काहीही वापर क्षण न क्षण

योग्य आहे तेच , तू आता कर पण 



काहीही न करता काहीच मिळत नाही

प्रयत्न जितके तुझे तितकेच यश पाही

नशीब तुला मदत करेल तेंव्हाच फक्त मित्रा

प्रयत्नांच्या पराकाष्‍ठेची भरवशील जेंव्हा जत्रा



संघर्ष तर असेलच पावलोपावली जिथे

लढा अखंड ठेवलास तर तगशील तिथे

यातून कणखर होशील पोलाद बनेल मन

कळेल तुला यातून अखेर काय जगाचे रण





यश मिळेल खरं जिथे सुरूवात करशील

प्रयत्नांवर प्रयत्न सातत्य जिथे ठेवशील

एकच ध्यास धरशील जेंव्हा सारे सोडून पाठी

जग मदत करेल सारे तुला जिंकण्यासाठी

- समीर पु. नाईक