Tuesday, March 12, 2013

कविता - २


मी शोधतोय एक आभाळ
थेंबांनी भरलेलं ..
कवितेतल्या पावसासाठी

थोडीशी प्राजक्ताची फूलं
वेचली आहेत कवितेत
माळण्यासाठी

काहीशा चांदण्या आणि चंद्रमा
यांचेही छोटे छोटे तुकडे
पेरले आहेत कवितेत

प्रेम , विरह आणि
त्या भावना
ठेवल्यात मी शिल्लक
कवितेत वापरण्यासाठी..

जगण्यातील अर्थ
नात्यातील गुंता,
भावनांची घालमेल
यावरही काही ओळी
लिहील्यात कवितेच्या

छंद,यमक,अर्थ
नवे जूने विषय
यांचेही भान
राखून पाहीले...

माझा स्वतःचा,
जगाचा शोध
आमचा परस्परसंबंध
हेही ताडून पाहीलंय
कवितेच्या सहाय्याने

एकांत,शांतता,रितेपणा
कधी गर्दी,
भरलेले मन नी साचलेपण
कधी विकारांचा भडका
यावरही येथेच्छ 
लिहील्यात कविता

कुठेतरी गुंतलेल्या
मनाला पुन्हा
ओढून आणले
काही पडलेले पीळ
सोडवू पाहीले
कवितेने..

असे एक ना अनेक
मी अजूनही शब्दांशी
चाचपडतोय
अडखळतोय कवितेपाशी

आणि ही कविता नसावी
असावा प्रयत्न कवितेचा
कवितेला शोधण्याचा
काही ओळीतून..!

  - समीर पु.नाईक  

Friday, January 20, 2012

कविता............-१



तूच गेलीस दुर अचानक
कोणताही मागमूस ना
पाऊलखुणा नसलेल्या
त्या वाटा अवघ्या पुसलेल्या
जागोजागी शोधून पाहता
खाणाखूणा मिटलेल्या
स्वप्नांमध्ये मधेच कुठूनी
काचा खसकन घूसलेल्या

पण आशा माझ्या
तितक्या कणखर
खोलखोल त्या
रूतलेल्या.......
शोधत येईन , थांब जरा तू
अवचित वाटा दिसलेल्या
इच्छांपुढती मार्गच नमती
हजार युक्त्या सुचलेल्या
मिटले मधले अंतर सारे
तशात कविता स्फुरलेल्या.....

          - समीर पु. नाईक

Monday, October 31, 2011

*आयुष्याची परिभाषा....*




माझे मजला छळत राहते , अबोल क्रंदन मौनाचे
संदर्भांचे माग जिव्हारी  , पुसट शोधतो स्वप्नांचे 

असे स्वातीचे थेंब कोणते , जगता जगता निसटून जावे
मनात नाजूक कोष विणावे , अन कोठे जगण्यात झूरावे

अशाच वेळी कसे उमगले , हे अडणारे कोडे
चौकटीतच गच्च बसवले , जगणे...चौकटीला मोडॆ 

चेहर्‍यावरती हसून थोडे ,  आनंदाची वाटावी गाणी
काही स्वप्ने भिरभिरणारी , हळूच अलगद कवेत घ्यावी

रंगाचे फटकारे ओढून , रंगवावे रंगांना केंव्हा
पाण्याला पाजावे पाणी , खळखळत्या ओढ्याचे जेंव्हा

प्राजक्ताचे सडे सभोवती , फुले तुजवरी उधळावी
तुझीया कुरळ्या केसांमध्ये , जागोजागी माळावी

झोकून द्यावे स्वत: स्वत:ला , मुक्त मोकळ्या अवकाशी
साकारावे गुज मनीचे , जपून ठेविले हृदयाशी
कळली मजला थोडी आहे , आयुष्याची परिभाषा
पुन्हा ओढल्या हाताने या , हातावरती नवरेषा 
                         
                                     - समीर पु. नाईक

Thursday, September 22, 2011

शोध...............



अस्तित्वाच्या पाऊलखुणा शोधून बघताना
माझ्या असण्याच्या आणि नसण्याच्याही..
अलिकडच्या आणि पलिकडच्याही....
भूतकाळातील, वर्तमानाच्या...भविष्याच्याही
मी नव्या खूणांना कळत-नकळत जन्म देत जातो..

हे सतत असेच चालू राहणार आहे....
माझ्या इथल्या अस्तिवाच्या असण्यापर्यंत
कधीकाळी माझ्या खूणांचा कुणी शोध घेईल........??
त्या खूणांचा हात धरून कुणीतरी.......
पोहोचेल माझ्या अंतरंगापर्यंत........??

जर पुढे खरंच कधी असा प्रयत्न केला गेलाच
तर नक्की काय हाती लागेल त्यांच्या......??
ते निराश होणार नाहीत याची खात्री आहे मला
त्यांना सापडतील काही प्रामाणिक प्रयत्न
सगळेच नाही जपता येत..हे लक्षात असताना सुद्धा प्राणपणाने केलेले....

माझ्या मनाचा थांग शोधावा त्यांनी
माझ्या अलिप्ततेचे रहस्य सोडवावे
माझ्या आत सदैव चाललेला लढा पाहावा
सत्-असत् चा संघर्ष....शिकावे त्यातून..
आणि घ्यावे... घेण्यासारखे काही.... वाटलेच तर





                                             - समीर पु. नाईक



Wednesday, August 24, 2011

उठ , उठ , चालत रहा ........................


उठ , उठ , चालत रहा ........................
उठ , उठ , चालत रहा
पडला तरी थांबू नकोस
पुन्हा टाक नवं पाऊल
जगाला कारणं देऊ नकोस

जग पक्कं स्वार्थी बघ
पडला तरी हसून मग
खवचट शेरे , कुजकट टोमणे
दाखवून दे रक्तातील धग
तुझी वाट शोधून त्यावर
नव्याने रस्ता बांधून काढ
उठ , उठ , चालत रहा
पडला तरी थांबू नकोस
पुन्हा टाक नवं पाऊल
जगाला कारणं देऊ नकोस

रस्त्यावर लाव झाडं अनेक
कर्तृत्व-मोहोर असलेली
जप त्यांना , वाढू दे ती
फळांना कीड नसलेली
मग बहर- वसंत येईल
स्थिर-स्थावर आयुष्य होईल
उठ , उठ , चालत रहा
पडला तरी थांबू नकोस
पुन्हा टाक नवं पाऊल
जगाला कारणं देऊ नकोस

यशाच्या त्या शिखरावरती
सदैव राहा सावध फार
समोर नजर , आभाळी हात
पाय मात्र जमिनीवर
नकोस करू कुणाशी खार
ध्यानात ठेव इतकंच सार
उठ , उठ , चालत रहा
पडला तरी थांबू नकोस
पुन्हा टाक नवं पाऊल
जगाला कारणं देऊ नकोस
                   
                   - समीर पु.नाईक