काही थेट आतून उतरलेले, काही जाणीवपुर्वक बांधलेले, थोडेसे विचारात मांडलेले, थोडे चुकून सांडलेले......................शब्द !
Tuesday, March 12, 2013
कविता - २
मी शोधतोय एक आभाळ
थेंबांनी भरलेलं ..
कवितेतल्या पावसासाठी
थोडीशी प्राजक्ताची फूलं
वेचली आहेत कवितेत
माळण्यासाठी
काहीशा चांदण्या आणि चंद्रमा
यांचेही छोटे छोटे तुकडे
पेरले आहेत कवितेत
प्रेम , विरह आणि
त्या भावना
ठेवल्यात मी शिल्लक
कवितेत वापरण्यासाठी..
जगण्यातील अर्थ
नात्यातील गुंता,
भावनांची घालमेल
यावरही काही ओळी
लिहील्यात कवितेच्या
छंद,यमक,अर्थ
नवे जूने विषय
यांचेही भान
राखून पाहीले...
माझा स्वतःचा,
जगाचा शोध
आमचा परस्परसंबंध
हेही ताडून पाहीलंय
कवितेच्या सहाय्याने
एकांत,शांतता,रितेपणा
कधी गर्दी,
भरलेले मन नी साचलेपण
कधी विकारांचा भडका
यावरही येथेच्छ
लिहील्यात कविता
कुठेतरी गुंतलेल्या
मनाला पुन्हा
ओढून आणले
काही पडलेले पीळ
सोडवू पाहीले
कवितेने..
असे एक ना अनेक
मी अजूनही शब्दांशी
चाचपडतोय
अडखळतोय कवितेपाशी
आणि ही कविता नसावी
असावा प्रयत्न कवितेचा
कवितेला शोधण्याचा
काही ओळीतून..!
- समीर पु.नाईक
Subscribe to:
Posts (Atom)