Thursday, May 19, 2011

|| श्रीगुरू शोध || - अभंग

|| श्रीगुरू शोध || - अभंग 


प्रियेस पाहण्या
गोळा झाले प्राण
ऐश्वर्याची खाण
तेज रूपा ||१||

थोडे भान आले
तिचे कधीतरी
तळमळे उरी
प्राप्तीसाठी ||२||

तिला भेटायाला
जीव आसुसला
जमेना स्वत:ला
अर्धवट  ||३||

अशा वेळी तेंव्हा
कृपा तव केली
धावली माऊली
गुरुराया  ||४||

गुरू छायेखाली
जाणले समूळ
आतले निर्मळ
जग सारे  ||५||

दोन वाटा तिच्या
एकत्वच गाभा
आतमध्ये शोभा
तिच्या मुळे ||५||

सात घरे तिची
बांधूनी ठेवली
द्वारे उघडली
चैतन्याची  ||६||


जागलेली प्रिया
मज जागे करी
संपूर्ण उध्दरी
स्वरूपाला ||६||

भेटे शिव तेथे
एकरूप होई
विरूनीया जाई
आत्मरूप ||७||

एव्हढे सगळे
झाले कसे काय
सदगुरूराय
आशीर्वादे ||८||

कसे फेडू तयां
मोठे उपकार
श्रीगुरू आधार
बालकाचा  ||९||

भेद दूर करी
गोविंद भेटवी
श्रीगुरू थोरवी
वर्णू किती ||१०||

जाणण्या सकळ
एक ते करणे
निरंजन म्हणे
श्रीगुरू शोध ||११||

- समीर पु. नाईक