Friday, December 31, 2010

सुरूवात....

भानस यांची ’ खीर ’ ही कथा वाचून जे सुचलं खरं तर उतरत गेलं .......


http://www.mimarathi.net/node/4664




सुरूवात....
सुन्न....स्तब्ध....शांत रे !

अस्वस्थ....सूर....आर्त रे !

केव्हढाले....प्रश्न....हे !

सुटता सुटेना एव्हढे......



फाटका....संसार....रे !

वंचनांना....तोंड....रे !

अभंग....आहे....आत....रे !

दु:ख बोलघेवडे.......


माझे....नाही....काही....रे !               

लढा....रोजचाच.... रे  !

पिलांना....फक्त....जेवू....दे  !

घास जरी कोरडे......



इतुकीच....ही....प्रार्थना !

विश्वंभरा...करूणाघना !

पुन्हा....नवी....सुरूवात....रे...!

लक्ष ठेव तेव्हढे.......      

                 - समीर पु.नाईक

Thursday, December 30, 2010

अभ्यास ....!

कोण्या एकेकाळी..................




अभ्यास ....!



गाऊ नको , नाचू नको
बाबा म्हणती मला

शांत बस आता नाहीतर
 
फटके देईन तूला                                              



आई म्हणे बाळ माझा

बाबा म्हणती हेला

अभ्यासाच्या नावाखाली

गोंधळ फक्त केला 



बोलू नको मध्ये मध्ये

फार नालायक झाला

अभ्यास एके अभ्यास कर

टाकला बॉम्बगोळा



आता गुपचूप बसलो

पण मूड माझा गेला.

पुस्तक धरून नाटक केले

वेळ मारून नेला



आई भूक लागली मला

माझा अभ्यास झाला

दाखव म्हणे आई आधी

बाण वाया गेला



शेवटी केला अभ्यास मग

नियमीत केली शाळा

आई-बाबा म्हणती आता

शहाणा आमचा बाळा

                 - समीर पु.नाईक


Tuesday, December 28, 2010

माझीया अंगणी............ !

माझीया अंगणी............ !


माझीया अंगणी, रोज आता, ओसंडतो पारिजात
भारून वारा , गंधून सारा , येतो घरात



भूईने माळली , चांदणफूले , जणू देहात
धूंदल्या दिशा , परिमळे कशा , अवघ्या जगात



रातराणी ती , कोपरा एक , व्यापून जात

जाई-जूई , कल्पवृक्ष माझ्या, छोट्या जागेत



सोनचाफा तो , देखणा एक , उभा दारात

प्रसन्न मोगरा , फूलांनी भरला , तो ताटव्यात



चिमणे पक्षी , चिवचिव किती , रोज येतात

फूलपाखरे ती , रंगाची उधळण , माझ्या बागेत



तुळशी पवित्र , दिवा तेवत , वृंदावनात

आंब्याचे झाड , मांगल्य तोरण , त्याच्या छायेत



पाऊस बघे , थांबून वरती , त्या अंबरात

टपोर्‍या थेंबात सिंचत जीवन , ये आवेगात



ऋतूही येती, नाचत सर्व , गाणे गात

सूर्य-चंद्र , आणिक तारे , अचंब्यात



बहर मनाला , नव्याने आलेला, जसा प्रेमात

प्रियेने दिलेले , चोरटे चुंबन , केवळ लक्षात



सुखद लाटा , मंद मंद . आयुष्या येत

आशेला लाभले गरूडाचे पंख झेप जोशात                            

- समीर पु. नाईक                                                  



(पुर्वप्रसिध्दी-शब्दगारssवा हिवाळी अंक २०१०)

Saturday, December 25, 2010

तुला पाहताना...............

ही माझ्या सुरूवातीच्या कवितांपैकी एक !




तुला पाहताना...............



तुला पाहताना धुंद फुलला केवडा

तुला पाहताना होई प्राजक्ताचा सडा

तुला पाहताना निशिगंध मोहरला

तुला पाहताना ऋतू बहर बावरा



तुला पाहताना भान हरपले माझे

तुला वर्णताना शब्द हरवले माझे

तुला पाहताना मन गुंतले ग माझे

तुला पाहताना चांदणे सुध्दा फिके                



तुला पाहताना अंगी रोमांच उठले

गंध तुझा येताक्षणी श्वास श्वास हे फुलले

तुला पाहताना तुझा कटाक्ष हा असा

झाला झाला ग सखये जीव माझा वेडापिसा





तुला पाहण्याचा छंद लागला ग मला

तुला पाहताना सार्थ झाल्या ग गझला

कधी येशील ग सखे , हुरहूर मला लागे

वाट तुझी पाहताना , नेत्र रात्रंदिन जागे .

- समीर पु. नाईक

Friday, December 10, 2010

का रे..................................?

का रे.................................?


का रे नाही जाताना तू पाहीलेस मज एकदाही पण

आले असते, धावत मीही, विसरून सारे भळभळते क्षण

साकळलेले या वळणावर , संशयाचे काळेसे ढग

शेवटसंधी आता नाही,आता केवळ हळहळते मन



सलणारा तो काटा ह्रदयी डोई पडती घणघणते घण

विसरू आपण, वाटे सोपे, आता कळले अवघडलेपण

काय करू मी सांग सख्या रे, तूच छळतो आताही मज

अबोल दिसले वरून कितीही,मनात आहे रणरणते रण



सावरणारा तूच असा रे गेला निसटून हातातून पण

गोळा करण्या, अजूनही आतूर, विस्कटलेले सोनेरी कण

पाणी डोळा दाटू आले , कातर आशा केव्हढीही बघ

परतून येशी म्हणून तू रे,जागी आहे केंव्हाची अन

- समीर पु.नाईक

Monday, November 29, 2010

माझे मीपण, माझे मीपण !

माझे मीपण, माझे मीपण !




अलगद , अवचित असलेले

अ‌न अनंत रेषा पुसलेले

जे तरीही आहे उरलेले ते

माझे मीपण, माझे मीपण !



नकळत येई जे ओठांवर

डोकावत अन क्षणाक्षणातून

केंव्हा कधीही कुठेही उमटे

माझे मीपण, माझे मीपण !



लपंडाव ते राही खेळत

शोधाया मी जातो जेंव्हा

अचानक अन समोर येई

माझे मीपण, माझे मीपण !



प्रकटे केंव्हा अनपेक्षित ते

अहंकार मी लपवत आलो

नाही लपले , नाही मिटले

माझे मीपण, माझे मीपण !



उलगडलेले नाही मजला

माझे मोठे कोडे अवघड

व्यक्तातून ते उमलत अनवट

माझे मीपण, माझे मीपण !



नेणीवेतून येते अवखळ

देई मजला ओळख अवघी

ज्यातून कळले कोण मी अन

माझे मीपण, माझे मीपण !

- समीर पु.नाईक



Friday, November 26, 2010

कर्तृत्व-वास्तव

कर्तृत्व-वास्तव


कधी कोण आम्हा पुसे काय केले

असे मोठे काय हे कर्तृत्व असले ?



इथे ना स्वयंभू कुणी जन्मलेले

इथे ना कुणी विहंगातून आले



कुणी ना इथे सर्वही प्राप्त केले

कुणालाही कोठे आपोआप आले



कुणा वाजवू द्या, नगारे दुदूंभी

कुणा दाखवू द्या जगाला कितीही



जरी आम्ही केलेले झाकोळले ते

जरी ना कुणाच्याही लक्षात आले



वाट्यास आली कितींना उपेक्षा

ना ढळले ,ना चळले,कितीही प्रतीक्षा



नव्या कल्पनांना सुळाचीच हाक

जूने सत्य शाबूत, दाबून नाक



जसा सूर्य गेला ढगाआड जेंव्हा

नाही अस्त झाला, जरी वाटे तेंव्हा



अहो फेकलेला जरी कोळसा तो

वर्षांनी किती एक हिरा मात्र होतो



आम्हा ठाम विश्वास केले जेही आम्ही

कळाया तुम्हाला नाही पात्र तुम्ही



नव्हे स्व:स्तूती ही, असे स्व:त्वजाण

नव्हे वल्गना या , असे आत्मभान



हा नाही तुमचा अपमान केला

दिला हाती फक्त वास्तवाचा प्याला
 - समीर पु.नाईक

Saturday, November 20, 2010

. . . . . . . . आत-बाहेर . . . . . . . . .

. . . . . . . . आत-बाहेर . . . . . . . . .



आतमध्ये उसळणारा प्रक्षोभ शांत होईना

अंतरंगीच्या व्यथेला जखम म्हणता येईना !



आतमध्ये उसळले जे व्यक्त करता येईना

अव्यक्त जो दाह माझ्या ह्रदयास आता साहीना !



प्रकटण्या प्रस्फोट होण्या एक क्षणही राहीना

उफाळत्या भावनांना फक्त शरीर साथ देईना !



आत आणि बाहेराचा थांग कुठे लागेना

चोर आणि साव जसे एक होण्या राहीना !


अंतरीचा सूर माझा मालकंस होईना

गैर आणि आपल्याचा फरक येथे राहीना !


                                            - समीर पु. नाईक

Friday, November 19, 2010

! अशांत !

! अशांत !






अलिकडेच झालो आहे

रूक्ष-शूष्क यंत्र मी

भावनांच्या कल्लोळातही

संवेदनाहीन शांत मी



रोजचे सारेच आहे

रोजचाच तोच मी

वेदना रोजच्याच त्याही

संवेदनाहीन शांत मी



बेगड्या गर्दीत सार्‍या

अस्वस्थ श्‍वास आणि मी

अपेक्षांचे पर्वत तरीही

संवेदनाहीन शांत मी



रक्‍त आटतेच आहे

कोरडाच राही मी

सत्व संपले येथ

संवेदनाहीन शांत मी



आत उरल्याच इच्छा

अंतपार एक मी

काय मजला करायचे होते

आता उरलो अशांत मी



- समीर पु. नाईक

पुर्वप्रसिध्दी " मोगरा फुलला दिवाळी अंक २०१० "

Thursday, November 18, 2010

! एकेका अक्षरात !

! एकेका अक्षरात !


शब्दांचा देई हात

अर्थांची रम्य साथ

चित्प्रकाश ह्र्दयात

एकेका अक्षरात

उभा माझा रमानाथ !



शब्द देई वेगळाले

अर्थाचा जणू कांत

चैतन्यच साक्षात

एकेका अक्षरात

उभा माझा रमानाथ !



शब्द देई अर्थवाही

शब्द-अर्थ दूधभात

चेतनेची एक वात

एकेका अक्षरात

उभा माझा रमानाथ !



शब्द देई भव्यपूर्ण

अर्थाचा आधारभूत

चिन्मय तो एक नित्य

एकेका अक्षरात

उभा माझा रमानाथ !



शब्द देई लिहीण्यास

अर्थ जणू अवकाश

चिद्‍घन तो अज्ञात

एकेका अक्षरात

उभा माझा रमानाथ !



सृजनाची देई शक्‍ती

निर्मितीचा निमित्‍तमात्र

पाठीवर देई थाप

एकेका अक्षरात

उभा माझा रमानाथ !



- समीर पु. नाईक

पुर्वप्रसिध्दी " मोगरा फुलला दिवाळी अंक २०१० "

Monday, November 1, 2010

तुझी वाट पाहताना ..................

तुझी वाट पाहताना ..................




चातक झालाय माझा

तुझी वाट पाहताना

जणू तू आलीच आहेस

अशी कल्पना करून बघताना !



प्रतीक्षेचा क्षण आणि क्षण

किती मोठा असतो नाही

स्वत: प्रतीक्षा केल्याशिवाय

तुला हे कळणारच नाही !



आता येशील, तेंव्हा येशील

अशी मनाची समजूत घालतोय खरी

पण हुरहूर आता वाढत चाललीय

ही गोष्ट सुध्दा तेव्हढीच खरी !



जणू तू समोरच आहेस

असं समजून घेताना

पापण्या मिटतच नाहीत डोळ्यांच्या

तुला साठवून घेताना !



केंव्हाची मी वाट पाहतोय

आता आर्त साद घालतोय

जन्मजन्मांतरीच्या सोबतीसाठी

फक्त तुझाच हात मागतोय !



- समीर पु.नाईक

Friday, October 29, 2010

सत्यदर्शन

सत्यदर्शन

भय कोठून दाटून आले

वास्तव अनपेक्षीत होते

सत्याचे ते निष्‍ठूर दर्शन

माझे काळीज जाळीत होते



संकटांचे भीषण पर्वत

खदाखदा ते हासत होते

मना ज्यांचाच विश्वास होता

आज ते गळा कापत होते



मन माझे अगतिकतेने

केविलवाणे ते झाले होते

धाव धाव रे जगदाधीशा

तुज वाचून नच कोण ते



                                      - समीर पु. नाईक

Thursday, October 28, 2010

आठव....................................................

आठव.....................................................
सखे तुझी सय येते

माझे मन पिसे होते

आता फक्त स्वप्नात भेटतोय

मनसोक्त गप्पा मारतोय

तुझं लाजणं,खळखळून हसणं

तुझं दिसणं,तुझं बोलणं

तुझा आठव जरा जास्त होतोय !



तुझं गाणं,तुझा स्वर

जसा साक्षात ईश्वर

तू डोळे मिटून गाते आहेस

मी नि:शब्दसा तुला पाहतोय

तू गाण्यात , मी तुझ्यात

आपण दोघेही हरवलेले

तुझा आठव जरा जास्त होतोय !



तू गेलीस , अशी दूर

कळेना कोणता कसूर

व्यक्त होणे राहून गेले

नंतर बघूया ,पडले अंतर

बोलायचीस पण, फक्त प्रश्नांच्या उत्तरात

रिक्त एकाकी मी आता

तुझा आठव जरा जास्त होतोय !

                                         - समीर पु.नाईक

Tuesday, October 26, 2010

हे ईश्वरा !

 हे ईश्वरा !







भासांचा आभास तू


श्वासांचा निश्वास तू


स्वप्नांचा ध्यास तू


ह्र्दयाची आस तू


                               सर्वव्यापी हरिहरा !






वार्‍याची झूळूक तू


भास्कराचे तेज तू


सागराची गाज तू


क्षितीजाच्या पार तू


                              अनादी परमेश्वरा !






भावनेचे मूळ तू


विचारांचे सूत्र तू


अक्षराचा आकार तू


वाक्याचा अर्थ तू


                            आद्‍यशब्द सर्वेश्वरा !






लय , सूर , ताल तू


वेणूनाद छान तू


पक्ष्यांची तान तू


संगीताचे कान तू


                           नादब्रम्ह सुरेश्वरा !






धर्माचे सत्व तू


तत्‍वाचा आधार तू


कर्माचे अस्तित्व तू


श्रद्धेचा निदिध्यास तू


                                करूणाघन शंकरा !






कण कण सृष्‍टी तू


अदॄश्य आणि प्रकट तू


अंतरात सुक्ष्म तू


विश्वरूप सर्व तू


                               एकमात्र ईश्वरा !









                             - समीर पु. नाईक

Wednesday, October 20, 2010

...........................तो !

...........................तो !


तो अशाच एका वाटेवरती चालत होता ,अंधारलेल्या !

सोसत होता त्रास किती ,

टोचणार्‍या काट्यांचा,बोचणार्‍या वार्‍यांचा,

खोचक शेर्‍यांचा,तीक्ष्ण टोमण्यांचा,न दिसणार्‍या खड्ड्यांचा,

कुठूनतरी झालेल्या दगडांच्या मार्‍याचा.

कितीदा तरी तो पडला , गुडघे फुटले,

टाचेवरच्या भेगा अधिक गडद झाल्या,रक्ताळल्या ,

तरीही तो न थांबता अखंड चालत होता !

क्वचीत कौतूकही वाट्याला आले,तो फुशारून गेला नाही

सहानूभूती व्यक्‍त करणारे भरपूर ,तो ती गोंजारत बसला नाही

त्याची नजर थेट समोर होती ,

प्रलोभनांकडे तर त्याने ढूंकूनही पाहीले नाही

त्याच्या अपेक्षा कधी जन्मल्याच नाही,

इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तो धडपडत होता सतत !

चालतांना इतरांना सोबत घेण्याचा त्याने प्रयत्‍न करून पाहीला,

त्याला थोडं उशीरा लक्षात आलं,प्रत्येकाची वाट वेगळी आहे,

शक्य त्याला मदत करत चालत राहीला,तीव्र अंधारात

कारण ती वाट होती त्याच्या ध्येयाकडे जाणारी ,

त्याच्या आयुष्याला अर्थ देणारी !

एक दिवस तो त्या वाटेच्या टोकाला पोहोचला,

त्याच्या कष्टांचे सार्थक झाले, त्याचे ध्येय साध्य झाले

तो तिथेच थांबला पूर्ण विचार करून ,

जिथून त्याने प्रवास केला तिकडे तोंड करून

आणि ती अंधारी वाट अचानक उजळून गेली

कारण त्याच्या नंतर येणार्‍यांसाठी तो प्रकाश झाला होता !

                                                                   - समीर पु. नाईक

Monday, October 18, 2010

! चारोळ्या !

चारोळ्या


१]
गर्दीतच यायचं असतं


लक्ष वेधून घ्यायचं असतं

तुझं सगळं असंच असतं

जगाला काय कळत नसतं



२]
प्रेमाने भरल्या बाता

प्रेमाच्या पाऊलवाटा

प्रेमातच रूतला काटा

तरीही प्रेमची करावे

                         - समीर पु. नाईक

Wednesday, September 29, 2010

मन , स्वप्न , मी...........!

मन , स्वप्न , मी...........!



मन खुळे माझे, धावे स्वप्नांपाठी

की स्वप्न वेडे माझे,मनाचे सांगाती



मी पुसले मनाला, खरे आहे कारे

ते ही सांगे स्वच्छ,स्वप्न आहे सारे



आता मोठा प्रश्न, मन असे का करावे

जाणूनिया सर्व,तरी हिंडत फिरावे



स्वप्न सांगे मला ,माझे दिवाने जग

मन तुझे तरी, मागे राहील कसे मग



सांग स्वप्ना तुच,मन माझेही ऎकेना

प्रयत्‍न किती जरी ,मना जिंकता येईना



मन विचारी मला,जिंकण्याची काय व्याख्या

ती तर संदिग्ध आहे,अरे माझ्या सख्या



स्वाधीन आहे कारे, मी तुझेच ना मन

माझ्या अधीन सारे, भ्रमात किती जण



स्वप्ने आहेत म्हणून आहे बरं का जग

विचार कर राजा,नीट डोळे उघडून बघ



गोंधळ झाला माझा,मना आले मोठे हसू

चल मित्रा माझ्या,स्वप्नांच्या नावेत बसू


                                             -  समीर पु.नाईक

Monday, September 27, 2010

! शब्द !


! शब्द !

शब्द नवे ,शब्द जूने

शब्दातच काही उणे

शब्दांचा पोरखेळ

शब्दांचा नाही मेळ



शब्द काही अर्थपूर्ण

शब्द काही रिक्‍तशून्य

शब्दांच्या उत्‍तराला

शब्दावीण कोण अन्य



शब्द जणू तलवार

शब्द आगीचा प्रकार

शब्दांच्या डोही तेंव्हा

शब्दजल नितळ साकार



शब्द हा मधूंचा घट

शब्द नर्मदेचा तट

शब्द गंभीर सत्य

शब्द प्रवाही नित्य



शब्द अडतात काही

शब्द जाणणार नाही

शब्द सूर्याचा प्रकाश

शब्द कृष्ण अवकाश



शब्दांची एक भाषा

शब्दांनी जेंव्हा होते

शब्दातीत ही निराशा

शब्दांचीच फक्‍त तेंव्हा एक आशा !

- समीर पु. नाईक

Thursday, September 9, 2010

तू आलीस जेंव्हा तो क्षण .........

तू आलीस जेंव्हा तो क्षण .........



तू आलीस जेंव्हा ,तो क्षण
मी मनात ठेवलाय जपून


पहाट ओल्या दवाचे कण
निथळतात पाना पानातून



आकाश रिमझिमते भूमीवर
चिंब ,चिंब पाऊस धारांतून



वारा वाहतो असा धुंदलेला
गच्च हिरवटलेल्या रानातून



अग्नीचा नवा बघ प्रकार
तो जळतो फक्‍त विरहातून



रातराणीचा तो मुग्ध गंध
अनूभवतो तुझ्या श्‍वासातून



नव्याने आयुष्याचे आले भान
तुझ्या त्या गुणगुणण्यातून



तू आलीस जेंव्हा ,तो क्षण
मी मनात ठेवलाय जपून

                       - समीर पु.नाईक

Saturday, September 4, 2010

......आशा......

......आशा......


एकटा एकांतवास

माझाच मला सहवास

गर्दीचा हा आभास

                      होत आहे !



वाटते सगळेच माझे

खरी नाती, खरं प्रेम

स्वार्थाचे अस्तित्व येथे

                       कसे आहे !



रोखठोक व्यवहार व्यर्थ

भावनांना नाही अर्थ

निर्मळ पणाचा अभाव

                        येथ आहे !



प्रत्येकाचे वेगळाले

वागण्याचे मुखवटे

अंत आणि पार इथे

                        एक नाही !


झरा शुध्द वर्तनाचा

सापडे जेंव्हा कधी

जिवंतपणाच्या अस्तित्वाची

                       आशा आहे !

                 - समीर पु. नाईक

Thursday, September 2, 2010

! संचित !

        ! संचित !


वार्‍या वरती केस भुरभूरे

उभी ही नव यौवना

सलज्जतेचे रंग लेऊनी

स्वप्न नवे लोचना !



प्रसन्नतेचे तेज पसरवी

भाळून भास्कर चेहर्‍यावरती

हिरवा शालू आणिक त्यावर

लावण्याची गर्जत महती



सौंदर्याची रेखीव पुतळी

कनक तुझ्या त्या अंगावरती

रूपाने जे तूझ्या झळाळे

आभा जणू ही तूझीच भोवती



अवखळ तुझे रूप मनोहर

त्यावर अंगठा दुमडून किंचीत

मुग्ध कळी ती नाजुक सुंदर

कुणाच्या भाळी हे संचित ?

                          - समीर पु. नाईक

Wednesday, September 1, 2010

! अपुरा !

                         ! अपुरा ! 


अंतरीच्या वेदनेचा अंत काही दिसत नाही
दूरातही दूर कोठे घंटानाद होत नाही !












डोळ्यातली आसवे पुसता तरी येतात येथे
मनातला पाऊस मात्र दडतो चेहर्‍याच्या साथे !












संवादाचा तुटे पूल, मौनाचा क्षण कापरा
एक जरी पुढे आला, आपलाच हात अपुरा !













                                      - समीर पु. नाईक

Tuesday, August 31, 2010

उत्तर ............... !


          उत्तर ............... ! 


सांगाया जे पाहीजे ते तुला सांगायाचे राहीले

व्यक्‍त होण्या ह्रदय माझे मागे कसे राहीले


नयनांची भेट होता जे कळो आले असे

बोलण्याची वेळ येता शब्द हरवू लागले


भ्याडपणा असला कसा कोणी नसते साहीले

माघारीचे प्रश्‍न असले हेही नव्हते पाहीले


प्रश्‍न तो आमचाच होता म्हणून फक्‍त काळजी

उत्‍तर त्याचे शोधताना सर्व पणाला लागले.

                                       - समीर पु. नाईक

Monday, August 30, 2010

! अलिकडे !

        ! अलिकडे !


टेरेसवरती अलिकडे जेंव्हा मी जातो

टॉवर्सच्या जंगलात हरवून मी बसतो


सुर्योदय आणि सूर्यास्त टॉवर मागेच होतो

चांदोबा सुध्दा आता टॉवर मागे लपतो



टॉवर्स काय कमी होते ,जोडीला होर्डिंग आली

उंच उंच बिल्डिंगांची गर्दी फार झाली



टॉवर म्हणजे यांत्रिक झाड ,कावळा फक्‍त बसे

बाकी पक्षी दिसत नाहीत, गायब झालेत जसे



टॉवर मात्र हवेतच मोबाईलला रेंज

झाडं जरी तोडली तेव्हढाच जरा चेंज



काळ सतत बदलता आहे हे जरी खरं

मूळ कधी विसरू नये लक्षात ठेवा बरं



भौतिक आणि वास्तविक फरक थोडा यात

भौतिकतेची साधनं सुख भासवतात



नितळ सुख फक्‍त आहे निर्मळ त्या प्रेमात

निसर्ग सच्चा सोबती माणसांच्या जंगलात

                                  - समीर पु. नाईक

Tuesday, August 17, 2010

! कवी !

मी ऑर्कूट वरती माझ्या फ्रेंडसर्कलमध्ये मला आवडलेल्या , काही वेळा माझ्या कविता पाठवत असतो.


एकदा स्नेहाला [ माझी मैत्रीण ] पाठवलेली कविता वाचून तीने विचारले , काय रे तू चक्क कवी ????केंव्हा झालास ?



उत्‍तरात जे सुचले ती ही कविता !



   !   कवी !

ती मला विचारी
तू कवी केंव्हा झाला
आम्ही तिला कळविल्या
आमच्या कवी अवताराच्या लीला

ती पाहूनिया बाला
आमचा होश उडूनी गेला
आणि अस्मादिकांचा
तेंव्हाच कवी झाला

ऐकूनिया उत्‍तर आमुचे
ती पुढे मला म्हणाली
’ती ’बाला कोण आहे
सर्वांहूनी निराळी

आम्ही पुन्हा कळविले
मातीत येथल्या ती अप्सरा उतरली
क्षितीजाच्या पलीकडे
जशी चांदणी चमकली

परंतु आम्हापुढे ते
एक प्रश्‍नचिन्ह होते
ह्रदय आमुचे ते
तिजला माहितच नव्हते

भावनांना व्यक्‍त करण्या
कविता भला मार्ग आहे
म्हणून या कवीच्या
जन्मास अर्थ आहे !

                 -समीर पु. नाईक

Monday, August 9, 2010

? शाप ?


माझ्या कॉलेजमधील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली .मन विषण्ण होणे म्हणजे काय याचा नेमका अनुभव आला , त्यातच १०-१२ वी तील अगदी कोवळ्या मुलामुलींच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले. इतका मोठा आयुष्य संपविण्याचा निर्णय केवळ एखाद्‍यादुसर्‍या अपयशामूळे घेताना त्या मूलाला/मूलीला काहीच वाटलं नसेल ,संकटांना घाबरून पाठ फिरवायची नसते, त्याला सामोरे जायचे असते हे त्यांना कोणी कधी सांगितले नसेल , आई-वडीलां चा जराही विचार त्यांनी केला नसेल , की त्यांच्याच भीतीमूळे....................................................................?


प्रश्‍न न संपणारे ?????????????????????????

यामूळे साध्य काय झाले , काय उरले ,.............................................?????????

जे आतून आले ते वहीत उतरलं ........................................



? शाप ?

तो आत्महत्येचा अवघड

निर्णय घेऊन निघून गेला

मागे उरले फक्‍त

आभाळ फाटलेली माय

कोसळलेला बाप

आक्रंदणारी बहीण

आणि अनिश्‍चिततेचा शाप !

- समीर पु. नाईक

Saturday, August 7, 2010

! अवेळीचा पाऊस आणि तू !

! अवेळीचा पाऊस आणि तू !


अवेळी येणार्‍या पावसाला पाहून
मला आठवतेस ती , तू


धांदल, गडबड उडवणारी ,
चकीत करणारी तू


मी येतेय रे , आपण भेटूया
असल्या क्षूल्लक शिष्टाचारात न पडणारी तू


रोजच पडतोय असा येणारा पाऊस
आणि कालच भेटल्यासारखी बोलणारी तू


अवेळीच्या पावसाला मी हरखून पाहत राहतो
व वर्षभराचं एकदम बोलणार्‍या तूलाही


झाडं,रस्ते,बिल्डींग,बंगले सगळ्यांना चैतन्य देणारा पाऊस
माझ्या मनाचं मळभ हटवणारी तू


अवेळी आला तरी सुखावणारा पाऊस
प्रसन्नतेचा शिडकावा करणारी तू


अवेळी येणार्‍या पावसाला पाहून
मला आठवतेस ती , तू !

                         - समीर पु. नाईक

Friday, August 6, 2010

! प्रीत !

        ! प्रीत !


कासावीस जीव झाला
क्षण एक आठविता
भेट डोळ्यांची डोळ्यांशी
प्रीत दिसूनिया येता !


गुढ आपले गुपीत
दोघांनाच ठावे फक्‍त
मी सामोरीया येता
तुझा चेहरा आरक्‍त !


काळेभोर नेत्र तुझे
तू रोखुनीया पाही
तुझ्या नजरेत मी
असा गुंतूनीया राही !


सैरभैर मन माझे
आत हूरहूर दाटे
तुझा विरह,विरह
जसे गुलाबाला काटे !


मना फक्‍त हे कळेना
व्यक्‍त कसे मी करावे
सांग तूची प्रिये आता
किती किती मी झूरावे !

                                   -समीर पु. नाईक

! मुखवटा !

! मुखवटा !


मी खरा की तो खरा
प्रश्‍न हा जेंव्‍हा पडे
कल्पनांना माझ्या तेंव्‍हा
भेदूनी जाती तडे


तो निर्मळ,नितळ वागे असा
मागोवा घेताना त्याचा
मी नाटकी,कारस्थानी
हाच आहे माझा साचा


तो आहे स्वच्‍छ,अपेक्षांचा निरीच्‍छ
सच्‍छील वर्तनाचा आरसा जसा
मी मात्र सहज विरूध्‍द
कुटील आणि कृत्रिम आहे कसा ?


तो उदार आणि निर्विकार
चैतन्याचा साक्षात्कार
मी विकारांचा प्रकोप
प्रक्षुब्ध जसा हाहा:कार


तो आणि मी आहोत
गुंतलेल्या वटजटा
मी म्हणजे तो आणि
तो माझाच मुखवटा !

                                - समीर पु . नाईक

Thursday, August 5, 2010

! मन !

! मन !

रात्र काळी घनघोर
चित्‍त नाही थार्‍यावर
पाय फुटतील तसे
मन धावे वार्‍यावर

जरी पायी रूते काटा
मना त्याची तमा नाही
जगी निद्रीस्‍त शांतता
आत वादळाची ग्वाही

मन उद्वेगाने कुढे
संतापाची त्याला जोड
सैरभैर किती जीव
जाणीवांची तोडफोड

उद्रेकाच्या काळा मध्ये
हाती घडे काही बाही
मन पश्‍चातापी पोळे
त्याचा उपयोग नाही

रात्री नंतर तो दिन
जसा येई बरोबर
चित्‍त ताळ्यावर येई
चंद्र चांदणे पिठूर

ज्याला संयमाची जाण
त्याला जीवनाचे भान
मना आवर ठेविता
जगणेच मूक्‍त गान

                   -  समीर पु . नाईक

Wednesday, August 4, 2010

! जाग !


एके दिवशी सकाळी स्नान करून देवासमोर उभा राहिलो,नमस्कारासाठी हात जोडले आणि यात जराही
अतिशयोक्ती नाही..........................मनात शब्द उमटले , उमटत गेले. नंतर लिहून ठेवली .


जाणीवांच्या पार आता ध्यान माझे लागू दे !
अंतराच्या आतमध्ये आत्मज्योत पेटू दे !

झोपलेले ज्ञानचक्षू जागू दे,अनिवारू दे !
चेतनेला साथ आता सृजनशक्ती देऊ दे !

भान येथले जगाचे हरवू दे ,ते जाऊ दे !
सत्याला शोधण्याचे वेध फक्‍त लागू दे !

वासनांचे किल्मीष मनी जे नष्ट सारे होऊ दे !
षडरिपूंना तारतम्याचे ते कुंपण राहू दे !

विचारांच्या पलीकडे अस्तित्व आहे कोणते ?
अस्तित्वहीनतेचे रूप कैसे ते जाणूनी घेऊ दे !

संन्यस्त आणि गृहस्थ फरक कोणता असे !
युध्द आपापल्या जगांशी दोघांचेही सारखे !

सगुण आणि निर्गुणाचा भेद कोणता असे ?
जाणण्या त्या मूळ रूपा जाग मजला येऊ दे !

                             - समीर पु. नाईक