Monday, October 31, 2011

*आयुष्याची परिभाषा....*
माझे मजला छळत राहते , अबोल क्रंदन मौनाचे
संदर्भांचे माग जिव्हारी  , पुसट शोधतो स्वप्नांचे 

असे स्वातीचे थेंब कोणते , जगता जगता निसटून जावे
मनात नाजूक कोष विणावे , अन कोठे जगण्यात झूरावे

अशाच वेळी कसे उमगले , हे अडणारे कोडे
चौकटीतच गच्च बसवले , जगणे...चौकटीला मोडॆ 

चेहर्‍यावरती हसून थोडे ,  आनंदाची वाटावी गाणी
काही स्वप्ने भिरभिरणारी , हळूच अलगद कवेत घ्यावी

रंगाचे फटकारे ओढून , रंगवावे रंगांना केंव्हा
पाण्याला पाजावे पाणी , खळखळत्या ओढ्याचे जेंव्हा

प्राजक्ताचे सडे सभोवती , फुले तुजवरी उधळावी
तुझीया कुरळ्या केसांमध्ये , जागोजागी माळावी

झोकून द्यावे स्वत: स्वत:ला , मुक्त मोकळ्या अवकाशी
साकारावे गुज मनीचे , जपून ठेविले हृदयाशी
कळली मजला थोडी आहे , आयुष्याची परिभाषा
पुन्हा ओढल्या हाताने या , हातावरती नवरेषा 
                         
                                     - समीर पु. नाईक

Thursday, September 22, 2011

शोध...............अस्तित्वाच्या पाऊलखुणा शोधून बघताना
माझ्या असण्याच्या आणि नसण्याच्याही..
अलिकडच्या आणि पलिकडच्याही....
भूतकाळातील, वर्तमानाच्या...भविष्याच्याही
मी नव्या खूणांना कळत-नकळत जन्म देत जातो..

हे सतत असेच चालू राहणार आहे....
माझ्या इथल्या अस्तिवाच्या असण्यापर्यंत
कधीकाळी माझ्या खूणांचा कुणी शोध घेईल........??
त्या खूणांचा हात धरून कुणीतरी.......
पोहोचेल माझ्या अंतरंगापर्यंत........??

जर पुढे खरंच कधी असा प्रयत्न केला गेलाच
तर नक्की काय हाती लागेल त्यांच्या......??
ते निराश होणार नाहीत याची खात्री आहे मला
त्यांना सापडतील काही प्रामाणिक प्रयत्न
सगळेच नाही जपता येत..हे लक्षात असताना सुद्धा प्राणपणाने केलेले....

माझ्या मनाचा थांग शोधावा त्यांनी
माझ्या अलिप्ततेचे रहस्य सोडवावे
माझ्या आत सदैव चाललेला लढा पाहावा
सत्-असत् चा संघर्ष....शिकावे त्यातून..
आणि घ्यावे... घेण्यासारखे काही.... वाटलेच तर

                                             - समीर पु. नाईकWednesday, August 24, 2011

उठ , उठ , चालत रहा ........................


उठ , उठ , चालत रहा ........................
उठ , उठ , चालत रहा
पडला तरी थांबू नकोस
पुन्हा टाक नवं पाऊल
जगाला कारणं देऊ नकोस

जग पक्कं स्वार्थी बघ
पडला तरी हसून मग
खवचट शेरे , कुजकट टोमणे
दाखवून दे रक्तातील धग
तुझी वाट शोधून त्यावर
नव्याने रस्ता बांधून काढ
उठ , उठ , चालत रहा
पडला तरी थांबू नकोस
पुन्हा टाक नवं पाऊल
जगाला कारणं देऊ नकोस

रस्त्यावर लाव झाडं अनेक
कर्तृत्व-मोहोर असलेली
जप त्यांना , वाढू दे ती
फळांना कीड नसलेली
मग बहर- वसंत येईल
स्थिर-स्थावर आयुष्य होईल
उठ , उठ , चालत रहा
पडला तरी थांबू नकोस
पुन्हा टाक नवं पाऊल
जगाला कारणं देऊ नकोस

यशाच्या त्या शिखरावरती
सदैव राहा सावध फार
समोर नजर , आभाळी हात
पाय मात्र जमिनीवर
नकोस करू कुणाशी खार
ध्यानात ठेव इतकंच सार
उठ , उठ , चालत रहा
पडला तरी थांबू नकोस
पुन्हा टाक नवं पाऊल
जगाला कारणं देऊ नकोस
                   
                   - समीर पु.नाईक

Thursday, July 14, 2011

मी !


मी !
मला संताप येत नाही
कसलाही
आजूबाजूला कितीही बॉंम्बस्फोट
घडोत
माझं रक्त नाही येत
सळसळून !
दोन, चार , पंधरा , साठ
कितीही माणसं मेली
आणि शेकडो जण जखमी
तरी मी त्याच निर्विकारपणे
पुढची बातमी वाचतो
सरकार बॉंम्बस्फोटचा तपास
सी.बी.आय. कडे सोपवते
नेहमीप्रमाणेच
व्यक्त करते चिंता दहशतवादाबद्दल
आणि केला जातो निर्धार
नेहमीप्रमाणेच
काल गुजरात आज दिल्ली
आणखी कुठे ?
उद्या इथे परवा तिथे
तरीही मला फरक पडत नाही
मी शांत असतो तेव्हढाच वरतून
आत धुमसतो, अस्वस्थ होतो
कदाचित कुठे मळमळ व्यक्त होतेही
तेव्हढयापुरतीच !
फक्त एव्हढ्यावरच मी लढतो
दहशतवादाशी.....
मी या विराट समाजाचाच
एक भाग आहे !!
मुखवटे चढवलेले काही
घडवतात स्फोट
गर्दीची ठिकाणं हेरून
जात-पात,धर्म,पंथ,देश
यांच्याशी कुणाला घेणं आहे ?
मुखवटेही या विराट समाजाचाच
एक भाग आहेत !!
आता फक्त भीती मनात
भिनत चाललीये पार
स्वतःच्या साकळत चाललेल्या
जाणिवेची...........
- समीर पु.नाईक
..

Saturday, June 18, 2011

चारोळ्या .... !


चारोळ्या .... !

                  १) कधीकाळचे दाटून येते

                                          डोळा पाणी....

                                       आठवणींची हळवी ओली

                                          स्मरता गाणी....


२) माणूस नामक गर्दी मजला
   वेढून राही....
   एकाकीपण तरीही माझे
   संपत नाही....
                                        ३) अवघडलेपण येते मजला
                                             अशाच वेळी....
                                            सांगायाचे जेंव्हा तुजला
                                             सारे काही....

४) मला कळाले आज अताशा
   कविते विषयी....
   उत्स्फूर्ताचे गीत भिडतसे
   नेहमी हृदयी....
   
             - समीर पु.नाईक

पुर्वप्रकाशन : ऋतू हिरवा वर्षा विशेषांक २०११

Thursday, May 19, 2011

|| श्रीगुरू शोध || - अभंग

|| श्रीगुरू शोध || - अभंग 


प्रियेस पाहण्या
गोळा झाले प्राण
ऐश्वर्याची खाण
तेज रूपा ||१||

थोडे भान आले
तिचे कधीतरी
तळमळे उरी
प्राप्तीसाठी ||२||

तिला भेटायाला
जीव आसुसला
जमेना स्वत:ला
अर्धवट  ||३||

अशा वेळी तेंव्हा
कृपा तव केली
धावली माऊली
गुरुराया  ||४||

गुरू छायेखाली
जाणले समूळ
आतले निर्मळ
जग सारे  ||५||

दोन वाटा तिच्या
एकत्वच गाभा
आतमध्ये शोभा
तिच्या मुळे ||५||

सात घरे तिची
बांधूनी ठेवली
द्वारे उघडली
चैतन्याची  ||६||


जागलेली प्रिया
मज जागे करी
संपूर्ण उध्दरी
स्वरूपाला ||६||

भेटे शिव तेथे
एकरूप होई
विरूनीया जाई
आत्मरूप ||७||

एव्हढे सगळे
झाले कसे काय
सदगुरूराय
आशीर्वादे ||८||

कसे फेडू तयां
मोठे उपकार
श्रीगुरू आधार
बालकाचा  ||९||

भेद दूर करी
गोविंद भेटवी
श्रीगुरू थोरवी
वर्णू किती ||१०||

जाणण्या सकळ
एक ते करणे
निरंजन म्हणे
श्रीगुरू शोध ||११||

- समीर पु. नाईक

Tuesday, April 26, 2011

आता...............................


आता...............................

आता इथे ऊन पडेल
काळोखाचे राज्य सरेल
युगानयुगे अंधारात
विचारांच्या जंजाळात
मरगळलेल्या मनांमध्ये
आता कुठे जीव शिरेल
आता इथे ऊन पडेल

आले गेले झंझावात
नुसती आशा,कुठे वाट ?
स्वार्थी सारे बांडगुळ
त्यापेक्षा बरा आमचाच सूळ
तगमगलेल्या मनांसाठी
आता पूर्ण शांती उरेल
आता इथे ऊन पडेल

आम्ही केवळ रातकिडे
फक्त फक्त किरकिर घडे
अहोरात्र अंधारयुग
लढून भांडूनही उजेड सुख ?
काळ्या तमाचे अभेद्य कोट,तरी
आता त्यांचे राज्य सरेल
आता इथे ऊन पडेल

कारण आता आले भान
प्रकाशाचे रूप ज्ञान
गोठलेल्या संवेदनांना
जाणीवांनी दिले प्राण
खोलखोल सर्वदूर दिवा सारा
अंधाराच्या अज्ञानाला नाही थारा
आता इथे ऊन पडेल
काळोखाचे राज्य सरेल
                 - समीर पु.नाईक

Friday, April 22, 2011

! सचिन देवाची आरती !


http://www.mimarathi.net/node/5925 इथे सचिन च्या कामगिरी विषयी काही मौलिक विचार , प्रतिसाद , मतमतांतरे वाचनात आले.... त्या वरून रचलेली ही आरती...!
सचिन देवाची आरती !
जय देव जय देव जय सचिन देवा
तुमचे नी प्रसादे भारत विजयी व्हावा !!
जयदेव जयदेव....
कुणी म्हणे तुमची सेंच्युरी नको
भारत हरतो म्हणे खात्रीने लेको
नर्व्हस नाईंटी, दहा-पंधरा धावा
एवढ्याच तुम्ही काढाव्या देवा
तेंव्हा इतर खेळतील मोठ्या भक्ती भावा...
जय देव जय देव जय सचिन देवा
तुमचे नी प्रसादे भारत विजयी व्हावा !!
जयदेव जयदेव....
एकवीस वर्षे वाट पाहिली तुम्ही देवा
वर्ल्डकप जिंकायाला धोनीच हवा
तुमचे कौतुक करता दोष लागती
महापातकांचे डोंगर उभे राहती
व्यक्तीपूजक म्हणूनी लोकं हिणविती देवा
जय देव जय देव जय सचिन देवा
तुमचे नी प्रसादे भारत विजयी व्हावा !!
जयदेव जयदेव....
आकडेवारी ती दाखवूच नका
स्टॅटीस्टिक ते इंद्रजाल बघा
सांघिक यश ते खरे यश देवा
मॅन ऑफ दि मॅच चा नका खाऊ मेवा
आत्मा शून्य झाला आमुचा तो देवा
जय देव जय देव जय सचिन देवा
तुमचे नी प्रसादे भारत विजयी व्हावा !!
जयदेव जयदेव....
- समीर पु.नाईक

Thursday, March 17, 2011

तेच...तोच...तीच... !

तेच...तोच...तीच... !
तेच शब्द तीच शाई

तोच चाफा तीच जाई !काळजा मधील तीच व्यथा

पुन्हा पुन्हा जाळत राही !लिहीत रहा लिहीत रहा

ह्रदय माझे टोचत राही !पुन्हा परत तोच परिघ

तितक्याच कक्षा दाखवत राही !नाही नाही म्हणता म्हणता

घाण्याचा मी बैल होई !तसेच तेच होत असले

तरी त्याची भीती नाही !आत मन टक्क जागे

माझे सारे दाखवत राही !तेच जगणं नक्की काय

माझे मला उमगत राही !प्रवाहाच्या बाहेर जा रे

नव्या दिशा ठायी ठायी !- समीर पु.नाईक

Tuesday, March 1, 2011

एक तरी.................................??

एक तरी.................................??
मला काहीच नाही आठवत हल्ली

बस्स.........केवळ कानात मनात देहात

तुझे ते जीवघेणे सूर घूमत असतात

मल्हाराचे ..........

माझ्या डोळ्यातून आठवणी दाटून

केंव्हा घळघळायला लागतात ते माझे

मलाच कळत नाही.........

अताशा चेहराही साथ नाही देत ग मला

गर्दी नकोनकोशी होते...ओळखणार्‍यांची

मग आपण जायचो तसे नदीवर जातो.......

काठावर तासनतास बसून राहतो...

नितळ प्रवाही पाणी..........................

त्यात आपल्या खूणा शोधत राहतो

काही गडद , काही पुसटलेल्या

पाण्यात पाय सोडून बसलेल्या

वेड्या प्रेमिकांच्या जोडीगत.......................

तो बकुळीचा पार .....

दिवसच्या दिवस गप्पा

ऐकल्यात त्याने आपल्या

त्याला आता आपली खूप आठवण

येत असणार..................

मला आवडायचे म्हणून तू

भल्या पहाटे प्राजक्ताची फुले

वेचायला लागलीस.....

पहाटेची तुझी प्रिय झोप सोडून

माझ्यासाठी , माझ्या सोबत..............

तो भरभरून ओसंडणारा पारिजातक..

अजूनच रसरसून फुलायला लागला.

तूझ्या प्रेमातच पडला होता तो..

जिथे एरवी सडा पडायचा .. तिथे

खच पडायला लागला होता

नाजूकशा फुलांचा.....

अंगणामध्ये दिवे बंद करून

चांदण्यात बसायला कितीतरी

आवडायचं तुला..............

बहरलेल्या रातराणी सोबत

तू ही बहरून यायचीस......

तूझे लांबसडक मोकळे केस

सोडून तू समोर बसलीस की....

तुझ्या मांडीवर डोकं ठेवून

चांदण्याने भारलेल्या तूझ्या चेहर्‍याकडे

भान हरपून पहात रहायचो मी

चांदण्यात हरवलेल्या तुझ्या चेहर्‍याकडे

तूला ते माहीत असायचं.. नेहमीच

अचानक तूझे पाणीदार डोळे माझ्यावर रोखून

पहायचीस ....आणि खळखळून

हसायचीस...........

ते तूझे हसणं , सतत कानात

रूंजत असतं.....आजही , आताही..

नेमक्या अशाच चांदण्यारात्री

माझ्या कविता ऐकायचा

हट्ट असायचा तूझा.............

माझ्या कवितांना जोपासलं,

त्यात प्राण तूच ओतलेस......

क्वचित त्या चूकीच्या दिशेला

जाऊ नयेत म्हणून तूच

धडपडलीस.........

त्यांची प्रेरणाच तू होतीस ....

त्या तूलाच त्या कविता ऐकवण्यास

आतुरलेला मी बरसायचो उत्तररात्रीपर्यंत

माझ्या कितीतरी कवितांना या

उत्तररात्रीने जन्म दिला आहे......

तूझ्या अखंड प्रेमवर्षावात

भिजणारा मी !

आज तू जवळ नाहीस इथे ...

पण तरीही ज्या क्षणात तू

नाहीस असा एकही क्षण नाही...

तू सदैव आहेस...................

माझ्यात..............................

मी फक्त वाट पाहतोय तुझ्या परतण्याची

मी चूकलोय ........ तूला मी समजू

शकलो नाही काही ठिकाणी .. !

पण तरीही मी प्रयत्न केला होता ,

करतोय............

की माझ्याच नादात तूला

गृहित धरले गेले माझ्याही नकळत ???????????

प्रश्न भंडावतात मला पार.....

परतून ये ...

मला माझ्या चूकांचे

परिमार्जन करण्याची एक तरी

संधी दे..............................................!

                     - समीर पु.नाईक

Tuesday, February 22, 2011

! क्रिकेट विश्वकप आणू जिंकून !

हा एक प्रयत्न आहे.... मराठी खेळगीत { Marathi Cricket Anthem } लिहीण्याचा,... माझ्या प्रिय मित्र अमित पाटील ने सतत माझ्या मागे लागून मला पटवून दिले की हिंदी , इंग्रजी खेळगीत लिहीली जाऊ शकतात तर मराठी का नाही.........मराठी खेळगीत लिहीण्याची कल्पना त्याची आहे. मी यापुर्वी इतर भाषांमधील खेळगीतांचा , कोणत्याही खेळगीताचा अभ्यास केलेला नाही.... त्यामुळे हे स्वतंत्र खेळगीत आहे ... यावर कुठलाही प्रभाव नाही..... आपल्याला आवडेल अशी आशा करतो............ :)
! क्रिकेट विश्वकप आणू जिंकून !


धगधगल्या रक्तातील ज्वाळा

पुन्हा एकदा उठल्या पेटून
घोर क्रिकेटच्या युध्दासाठी

देश उतरले येथून तेथून

प्राण पणाला खेळू रेटून

क्रिकेट विश्वकप आणू खेचून !! धृ !!ईर्षा नाही ध्यासच केवळ

विजीगिषेचे अखंड कीर्तन

क्षणाक्षणाला रंग पालटे

अनिश्चिततेचे सदैव नर्तन

परतीचे ते दोरच कापून

क्रिकेट विश्वकप आणू खेचून !! १ !!नियतीचा चेंडू जरी असला

मैदानाच्या बाहेर उडवा

करू सामना, क्रिकेट जीवन

कितीही असू दे चेंडू फसवा

पाय आमचे घट्टच रोवून

क्रिकेट विश्वकप आणू खेचून !! २ !!बूडवून शाळा, कॉलेज, ऑफिस

टीव्हीपुढे त्या ठोकून मांडा

कितीकसारे दांड्या मारून
तिकीटासाठी लावीत रांगा

इतर सर्व बाजूला सारून

क्रिकेट विश्वकप आणू खेचून !! ३ !!नवोदित जरी अनेक संघ

लढावया ते परजून उठले

गुगली,षटकारांची अस्त्रे

स्टंपा, चेंडू कितीजरी फुटले

प्रतिस्पर्ध्यांच्या नांग्या ठेचून

क्रिकेट विश्वकप आणू खेचून !! ४ !!कोटी , अब्ज त्या श्रध्दा पाठी

ध्येयाच्या परिपुर्तीचा क्षण

खिलाडूवृत्ती ठेवू जागृत

गाजगाजवू क्रिकेट रणांगण

यशरस्ते ते सीमोल्लंघून
क्रिकेट विश्वकप आणू जिंकून !! ५ !!                         - समीर पु. नाईक


Monday, February 14, 2011

तुला कळावे .........

तुला कळावे .........


दिसलीस पुन्हा तू मजला

मी स्तब्ध थरारून गेलो

विरहांचे शतयुग मिटले

नि:शब्द शहारून गेलोभल्या दूपारी , अनवट वेळी

दूर उभी त्या झाडाखाली

अवचित मीही धावत सुटलो

किती दिसांनी भेट ही अपुलीमी मलाच शोधत होतो

नजरेस नजर ती भिडली

नयनात तुझ्या त्या लक्ष दिवे

पण क्षणात तू बावरली !काय करूच्या हिंदोळ्यावर

आत आत तू गुरफटली

वेदनेत त्या तिथेच थांबून

अलिप्तता मी पांघरलीमागील वेळी , हजार गुंते

वाट पाहूनी थकली तूही

माझी केवळ एकच चूक

मजला भीती ग्रासून गेलीजिथे जिथे तू समोर आली

चोरचोरट्या कटाक्ष भेटी

ठाऊक तुजला,ठाऊक मजला

परंतू नाही हिंम्मत झालीएके दिवशी मला पाहूनी

थांबलीस तू अवघड वेळी

परंतू नाही मीच थांबलो

काय हरवले संध्याकाळीनंतर गेली कुठे दूर तू

रात्र रात्र मी जागवली

तूझ्या घराची वाट न वाट

पायाखाली अनंत वेळीसलत राहिली माझी मजला

मुकेपणाची दूर्बलता

कोस-कोसले स्वत:स्वत:ला

केवळ हाती हतबलतातुला कळावे मन माझे ते

तूझ्या मनीचे मजला अन

चूकलेल्याला नाही संधी

नसू दे हे माझे प्राक्तनतूला पाहता फूटला अंकूर

पुन्हा पालवी आशेला

प्रयत्न आहे, कोंब फुटावा

अबोल माझ्या वाचेला

                             - समीर पु.नाईकTuesday, February 1, 2011

दूर्बळांनी........????

दूर्बळांनी........????
काय करावे ! कळेना कुणाला !

कुणीही न सांगे ! काहीची ना !!जीव जाण्यावरी ! टाहो हा फुटला !

कोणताही वाली ! उरेची ना !!भेदभाव कैसा ! जगी फक्त आहे !

कोणी तो आपला ! म्हणेची ना !!दूर्बळांनी जावे ! कोठे पांडूरंगा !

कटीवरी हात ! काढेची ना !!

                                - समीर पु.नाईक

Tuesday, January 11, 2011

ज्या गोष्टी......

ज्या गोष्टी......ज्या गोष्टी कधीही करायच्या नसतात मला
त्याच गोष्टी न चुकता करत जातो मीजसं कुणी वागण्याची मी कल्पनाही करू शकत नाही

अगदी तसाच वागत जातो मीजे करणे केवळ शुध्द मूर्खपणा आहे हे धडधडीत दिसूनही

तेच पुन्हा पुन्हा करत राहतो मीकाहीवेळा स्वत:चा तीव्र तिरस्कार वाटला तरीही

तसंच, तेच वागायची , करायची जिरत नाही माझी खूमखूमीसगळं काही कळत असूनही , हे सारे माझ्याही नकळत

होत असण्याच्या कारणाआड सहज दडायला नक्कीच आवडतं मलामी फक्त घाबरतो ते उघडा पडायला , म्हणून असेल कदाचित

कधीही कारणांची वानवा नसते माझ्याकडेकळकळीच्या उपदेशांच्या शेकडो डोसांकडे कानाडॊळा करून

इतरांना उपदेशायला सदैव अग्रेसर असतो मीचजरी मला माझंच कुठलं तरी अंतर्मन खात असले

आणि सद्‍सदविवेकबुध्दीचे भाले टोचत असले असंख्यनिर्ढावलेला निब्बरपणा समर्थ आहे माझा

अशा आतल्या शत्रूंना तोंड द्यायलानिव्वळ माझं व फक्त माझंच स्वार्थीपण हे

जगण्यासाठी असलेली धडपड मानतो मीज्या गोष्टी कधीही करायच्या नसतात मला

त्याच गोष्टी न चुकता करत जातो मी

- समीर पु.नाईक

Thursday, January 6, 2011

संयम रेष...............?

संयम रेष...............?


तो प्रीतीने व्याकूळलेला , सजण माझा वेडापीर

वियोग-क्षण ठेवीत दूर , करतसे मला उशीरजाऊ दे सजणा मजला , तुला आहे माझी आण

झाली रात्र किर्र अंधारी , तू असू दे थोडी जाणलावून मला हुरहूर , तो असा अधिर अधिर

नकळत रात्र सुध्दा , किती होई मदिर मदिरमाझी न राहीली मी रे , मी केवळ रोमांचित

अशा वेळी सखया माझ्या , सावरला का अवचित ?सौजन्याचा पुतळा आता , पण नंतर का हा वेश

चेतवून आधी मजला , का ओढलीस संयम रेष ?


- समीर पु. नाईक

Wednesday, January 5, 2011

युध्द......

युध्द......


एका भांडणाची गोष्ट............

आज लागले हे निराळेच सूर

चांदण्या दूर त्या , चंद्रही फितूरसंशयाचा उपटला कोणता असूर

ऐक ना हे प्रिये , मी बेकसूरकोण बोलले तुला ते पोरटोर

वाजवतो त्याला  जरा दोनचारपिकवले डोके तू , ही कुरबूर

ऐकता वरूनी हे , झाली गुरगूरभांडे आपटू नको तुझा बाsssप , थोर

कुठून लागला मला, हा नवा घोररागही देखणा तुझा चित्तचोर

आजही मी फिदा तू चंद्रकोरएकनिष्‍ठ मी असे , तू नेम हेर

कळेल सत्य तुला काय ते अखेरचाललो मी आता हे जग असार

लखलाभ असो तुला हा संसारनाक धरून मुठीत कशी शरण समोर

जिंकलो मीच, तू जरी युध्दखोर- समीर पु.नाईक

Saturday, January 1, 2011

तुला जिंकण्यासाठी ....... !

तुला जिंकण्यासाठी ....... !

कुठून तरी दूरातून चालत आला भास

स्वप्नांच्या प्रत्यक्षाची लावून गेला आस

उठ म्हणाला, नूसती बघू नकोत स्वप्नं

जागेवरती बसूनच सर्व काही जपणंसुरूवात कर लगेचच हीच योग्य वेळ

विचारपुर्वक कर सारे,सगळा घालून मेळ
वाया नको काहीही वापर क्षण न क्षण

योग्य आहे तेच , तू आता कर पण काहीही न करता काहीच मिळत नाही

प्रयत्न जितके तुझे तितकेच यश पाही

नशीब तुला मदत करेल तेंव्हाच फक्त मित्रा

प्रयत्नांच्या पराकाष्‍ठेची भरवशील जेंव्हा जत्रासंघर्ष तर असेलच पावलोपावली जिथे

लढा अखंड ठेवलास तर तगशील तिथे

यातून कणखर होशील पोलाद बनेल मन

कळेल तुला यातून अखेर काय जगाचे रण

यश मिळेल खरं जिथे सुरूवात करशील

प्रयत्नांवर प्रयत्न सातत्य जिथे ठेवशील

एकच ध्यास धरशील जेंव्हा सारे सोडून पाठी

जग मदत करेल सारे तुला जिंकण्यासाठी

- समीर पु. नाईक