Wednesday, September 29, 2010

मन , स्वप्न , मी...........!

मन , स्वप्न , मी...........!



मन खुळे माझे, धावे स्वप्नांपाठी

की स्वप्न वेडे माझे,मनाचे सांगाती



मी पुसले मनाला, खरे आहे कारे

ते ही सांगे स्वच्छ,स्वप्न आहे सारे



आता मोठा प्रश्न, मन असे का करावे

जाणूनिया सर्व,तरी हिंडत फिरावे



स्वप्न सांगे मला ,माझे दिवाने जग

मन तुझे तरी, मागे राहील कसे मग



सांग स्वप्ना तुच,मन माझेही ऎकेना

प्रयत्‍न किती जरी ,मना जिंकता येईना



मन विचारी मला,जिंकण्याची काय व्याख्या

ती तर संदिग्ध आहे,अरे माझ्या सख्या



स्वाधीन आहे कारे, मी तुझेच ना मन

माझ्या अधीन सारे, भ्रमात किती जण



स्वप्ने आहेत म्हणून आहे बरं का जग

विचार कर राजा,नीट डोळे उघडून बघ



गोंधळ झाला माझा,मना आले मोठे हसू

चल मित्रा माझ्या,स्वप्नांच्या नावेत बसू


                                             -  समीर पु.नाईक

Monday, September 27, 2010

! शब्द !


! शब्द !

शब्द नवे ,शब्द जूने

शब्दातच काही उणे

शब्दांचा पोरखेळ

शब्दांचा नाही मेळ



शब्द काही अर्थपूर्ण

शब्द काही रिक्‍तशून्य

शब्दांच्या उत्‍तराला

शब्दावीण कोण अन्य



शब्द जणू तलवार

शब्द आगीचा प्रकार

शब्दांच्या डोही तेंव्हा

शब्दजल नितळ साकार



शब्द हा मधूंचा घट

शब्द नर्मदेचा तट

शब्द गंभीर सत्य

शब्द प्रवाही नित्य



शब्द अडतात काही

शब्द जाणणार नाही

शब्द सूर्याचा प्रकाश

शब्द कृष्ण अवकाश



शब्दांची एक भाषा

शब्दांनी जेंव्हा होते

शब्दातीत ही निराशा

शब्दांचीच फक्‍त तेंव्हा एक आशा !

- समीर पु. नाईक

Thursday, September 9, 2010

तू आलीस जेंव्हा तो क्षण .........

तू आलीस जेंव्हा तो क्षण .........



तू आलीस जेंव्हा ,तो क्षण
मी मनात ठेवलाय जपून


पहाट ओल्या दवाचे कण
निथळतात पाना पानातून



आकाश रिमझिमते भूमीवर
चिंब ,चिंब पाऊस धारांतून



वारा वाहतो असा धुंदलेला
गच्च हिरवटलेल्या रानातून



अग्नीचा नवा बघ प्रकार
तो जळतो फक्‍त विरहातून



रातराणीचा तो मुग्ध गंध
अनूभवतो तुझ्या श्‍वासातून



नव्याने आयुष्याचे आले भान
तुझ्या त्या गुणगुणण्यातून



तू आलीस जेंव्हा ,तो क्षण
मी मनात ठेवलाय जपून

                       - समीर पु.नाईक

Saturday, September 4, 2010

......आशा......

......आशा......


एकटा एकांतवास

माझाच मला सहवास

गर्दीचा हा आभास

                      होत आहे !



वाटते सगळेच माझे

खरी नाती, खरं प्रेम

स्वार्थाचे अस्तित्व येथे

                       कसे आहे !



रोखठोक व्यवहार व्यर्थ

भावनांना नाही अर्थ

निर्मळ पणाचा अभाव

                        येथ आहे !



प्रत्येकाचे वेगळाले

वागण्याचे मुखवटे

अंत आणि पार इथे

                        एक नाही !


झरा शुध्द वर्तनाचा

सापडे जेंव्हा कधी

जिवंतपणाच्या अस्तित्वाची

                       आशा आहे !

                 - समीर पु. नाईक

Thursday, September 2, 2010

! संचित !

        ! संचित !


वार्‍या वरती केस भुरभूरे

उभी ही नव यौवना

सलज्जतेचे रंग लेऊनी

स्वप्न नवे लोचना !



प्रसन्नतेचे तेज पसरवी

भाळून भास्कर चेहर्‍यावरती

हिरवा शालू आणिक त्यावर

लावण्याची गर्जत महती



सौंदर्याची रेखीव पुतळी

कनक तुझ्या त्या अंगावरती

रूपाने जे तूझ्या झळाळे

आभा जणू ही तूझीच भोवती



अवखळ तुझे रूप मनोहर

त्यावर अंगठा दुमडून किंचीत

मुग्ध कळी ती नाजुक सुंदर

कुणाच्या भाळी हे संचित ?

                          - समीर पु. नाईक

Wednesday, September 1, 2010

! अपुरा !

                         ! अपुरा ! 


अंतरीच्या वेदनेचा अंत काही दिसत नाही
दूरातही दूर कोठे घंटानाद होत नाही !












डोळ्यातली आसवे पुसता तरी येतात येथे
मनातला पाऊस मात्र दडतो चेहर्‍याच्या साथे !












संवादाचा तुटे पूल, मौनाचा क्षण कापरा
एक जरी पुढे आला, आपलाच हात अपुरा !













                                      - समीर पु. नाईक