Tuesday, April 26, 2011

आता...............................


आता...............................

आता इथे ऊन पडेल
काळोखाचे राज्य सरेल
युगानयुगे अंधारात
विचारांच्या जंजाळात
मरगळलेल्या मनांमध्ये
आता कुठे जीव शिरेल
आता इथे ऊन पडेल

आले गेले झंझावात
नुसती आशा,कुठे वाट ?
स्वार्थी सारे बांडगुळ
त्यापेक्षा बरा आमचाच सूळ
तगमगलेल्या मनांसाठी
आता पूर्ण शांती उरेल
आता इथे ऊन पडेल

आम्ही केवळ रातकिडे
फक्त फक्त किरकिर घडे
अहोरात्र अंधारयुग
लढून भांडूनही उजेड सुख ?
काळ्या तमाचे अभेद्य कोट,तरी
आता त्यांचे राज्य सरेल
आता इथे ऊन पडेल

कारण आता आले भान
प्रकाशाचे रूप ज्ञान
गोठलेल्या संवेदनांना
जाणीवांनी दिले प्राण
खोलखोल सर्वदूर दिवा सारा
अंधाराच्या अज्ञानाला नाही थारा
आता इथे ऊन पडेल
काळोखाचे राज्य सरेल
                 - समीर पु.नाईक

Friday, April 22, 2011

! सचिन देवाची आरती !


http://www.mimarathi.net/node/5925 इथे सचिन च्या कामगिरी विषयी काही मौलिक विचार , प्रतिसाद , मतमतांतरे वाचनात आले.... त्या वरून रचलेली ही आरती...!
सचिन देवाची आरती !
जय देव जय देव जय सचिन देवा
तुमचे नी प्रसादे भारत विजयी व्हावा !!
जयदेव जयदेव....
कुणी म्हणे तुमची सेंच्युरी नको
भारत हरतो म्हणे खात्रीने लेको
नर्व्हस नाईंटी, दहा-पंधरा धावा
एवढ्याच तुम्ही काढाव्या देवा
तेंव्हा इतर खेळतील मोठ्या भक्ती भावा...
जय देव जय देव जय सचिन देवा
तुमचे नी प्रसादे भारत विजयी व्हावा !!
जयदेव जयदेव....
एकवीस वर्षे वाट पाहिली तुम्ही देवा
वर्ल्डकप जिंकायाला धोनीच हवा
तुमचे कौतुक करता दोष लागती
महापातकांचे डोंगर उभे राहती
व्यक्तीपूजक म्हणूनी लोकं हिणविती देवा
जय देव जय देव जय सचिन देवा
तुमचे नी प्रसादे भारत विजयी व्हावा !!
जयदेव जयदेव....
आकडेवारी ती दाखवूच नका
स्टॅटीस्टिक ते इंद्रजाल बघा
सांघिक यश ते खरे यश देवा
मॅन ऑफ दि मॅच चा नका खाऊ मेवा
आत्मा शून्य झाला आमुचा तो देवा
जय देव जय देव जय सचिन देवा
तुमचे नी प्रसादे भारत विजयी व्हावा !!
जयदेव जयदेव....
- समीर पु.नाईक