अस्तित्वाच्या पाऊलखुणा शोधून बघताना
माझ्या असण्याच्या आणि नसण्याच्याही..
अलिकडच्या आणि पलिकडच्याही....
भूतकाळातील, वर्तमानाच्या...भविष्याच्याही
मी नव्या खूणांना कळत-नकळत जन्म देत जातो..
हे सतत असेच चालू राहणार आहे....
माझ्या इथल्या अस्तिवाच्या असण्यापर्यंत
कधीकाळी माझ्या खूणांचा कुणी शोध घेईल........??
त्या खूणांचा हात धरून कुणीतरी.......
पोहोचेल माझ्या अंतरंगापर्यंत........??
जर पुढे खरंच कधी असा प्रयत्न केला गेलाच
तर नक्की काय हाती लागेल त्यांच्या......??
ते निराश होणार नाहीत याची खात्री आहे मला
त्यांना सापडतील काही प्रामाणिक प्रयत्न
सगळेच नाही जपता येत..हे लक्षात असताना सुद्धा प्राणपणाने केलेले....
माझ्या मनाचा थांग शोधावा त्यांनी
माझ्या अलिप्ततेचे रहस्य सोडवावे
माझ्या आत सदैव चाललेला लढा पाहावा
सत्-असत् चा संघर्ष....शिकावे त्यातून..
आणि घ्यावे... घेण्यासारखे काही.... वाटलेच तर

- समीर पु. नाईक