Monday, February 14, 2011

तुला कळावे .........

तुला कळावे .........


दिसलीस पुन्हा तू मजला

मी स्तब्ध थरारून गेलो

विरहांचे शतयुग मिटले

नि:शब्द शहारून गेलो



भल्या दूपारी , अनवट वेळी

दूर उभी त्या झाडाखाली

अवचित मीही धावत सुटलो

किती दिसांनी भेट ही अपुली



मी मलाच शोधत होतो

नजरेस नजर ती भिडली

नयनात तुझ्या त्या लक्ष दिवे

पण क्षणात तू बावरली !



काय करूच्या हिंदोळ्यावर

आत आत तू गुरफटली

वेदनेत त्या तिथेच थांबून

अलिप्तता मी पांघरली



मागील वेळी , हजार गुंते

वाट पाहूनी थकली तूही

माझी केवळ एकच चूक

मजला भीती ग्रासून गेली



जिथे जिथे तू समोर आली

चोरचोरट्या कटाक्ष भेटी

ठाऊक तुजला,ठाऊक मजला

परंतू नाही हिंम्मत झाली



एके दिवशी मला पाहूनी

थांबलीस तू अवघड वेळी

परंतू नाही मीच थांबलो

काय हरवले संध्याकाळी



नंतर गेली कुठे दूर तू

रात्र रात्र मी जागवली

तूझ्या घराची वाट न वाट

पायाखाली अनंत वेळी



सलत राहिली माझी मजला

मुकेपणाची दूर्बलता

कोस-कोसले स्वत:स्वत:ला

केवळ हाती हतबलता



तुला कळावे मन माझे ते

तूझ्या मनीचे मजला अन

चूकलेल्याला नाही संधी

नसू दे हे माझे प्राक्तन



तूला पाहता फूटला अंकूर

पुन्हा पालवी आशेला

प्रयत्न आहे, कोंब फुटावा

अबोल माझ्या वाचेला

                             - समीर पु.नाईक







6 comments:

  1. सुरेख! अगदी ती ओढ परंतु त्याचबरोबर भीती, जाणवून गेली! :)

    ReplyDelete
  2. सलत राहिली माझी मजला
    मुकेपणाची दूर्बलता
    कोस-कोसले स्वत:स्वत:ला
    केवळ हाती हतबलता
    AND
    तूला पाहता फूटला अंकूर
    पुन्हा पालवी आशेला
    प्रयत्न आहे, कोंब फुटावा
    अबोल माझ्या वाचेला
    100% PERFECT LINES ...
    shivchandra

    ReplyDelete
  3. "तुला कळावे मन माझे ते
    तूझ्या मनीचे मजला अन
    चूकलेल्याला नाही संधी
    नसू दे हे माझे प्राक्तन"

    माझ्या मनातल्या ओळी शब्दात मांडल्यास मित्रा.
    कविता आवड्ली.

    ReplyDelete
  4. अनघाताई ! भीतीच कदाचित या कवितेच्या निर्मितीचे कारण ठरली !
    प्रतिसादासाठी मनापासून आभारी आहे ! :)

    ReplyDelete
  5. शिवचंद्रजी ! अभिप्रायाकरिता मनापासून आभार आणि ब्लॉगवर सहर्ष स्वागत ! :)

    ReplyDelete
  6. राज ! जे आपल्या मनात तेच चार लोकांच्या मनात असंते असं श्रध्दा भोवड म्हणतात ....... ते खरेच आहे...........
    अभिप्रायासाठी मनापासून धन्यवाद ! :)

    ReplyDelete