Thursday, August 5, 2010

! मन !

! मन !

रात्र काळी घनघोर
चित्‍त नाही थार्‍यावर
पाय फुटतील तसे
मन धावे वार्‍यावर

जरी पायी रूते काटा
मना त्याची तमा नाही
जगी निद्रीस्‍त शांतता
आत वादळाची ग्वाही

मन उद्वेगाने कुढे
संतापाची त्याला जोड
सैरभैर किती जीव
जाणीवांची तोडफोड

उद्रेकाच्या काळा मध्ये
हाती घडे काही बाही
मन पश्‍चातापी पोळे
त्याचा उपयोग नाही

रात्री नंतर तो दिन
जसा येई बरोबर
चित्‍त ताळ्यावर येई
चंद्र चांदणे पिठूर

ज्याला संयमाची जाण
त्याला जीवनाचे भान
मना आवर ठेविता
जगणेच मूक्‍त गान

                   -  समीर पु . नाईक

No comments:

Post a Comment